“डॉक्टर, मी दही खाऊ ना?”

Bhardwaj Ayurved    04-Mar-2022
Total Views |

 
 
दही खूप आवडतं ना? शुभ्र पांढरं घट्ट दही बघितलं की जवळ जवळ सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं....चमचा खूपसला की वडीसारखं अलगद चमच्यात येणारं दही लगोलग जीभेवर ठेवलं की तॄप्त-तॄप्त वाटतं. असं असताना आम्ही वैद्य लोक "दही खाऊ नका- उन्हाळ्यात तर अजिबात नको" असं सांगतो तेव्हा पेशंटच्या चेह-यावर आश्चर्याचे आणि रागाचे भाव उमटतात. तर दही म्हणजे वैद्यांचा शत्रू असा समज होऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच!
 
दह्याचे गुण व अवगुण तसे संख्य़ेने समान आहेत. दही स्पर्शाला थंड वाटत असलं तरी गुणधर्माने उष्ण असतं. दही थंडीत खाल्ल्याने उष्णतेचा फार त्रास होणार नाही पण उन्हाळ्यात, ऑक्टोबर हीटच्या काळात आणि उष्णतेपाशी काम करणा-यांना हमखास त्रास होतो. नाकातून रक्त येणे, शौचावाटे-लघवीतून रक्त जाणे, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, पोटात-छातीत आग होणे, तळहात-पायांची आग होणे अशा तक्रारी संभवतात. दह्याने पित्त आणि कफ दोष वाढतात. शरीरात दोष साचून राहण्याची प्रवृत्ती वाढते. परिणामी वजन वाढणे, सगळ्या शरीरावर किंवा एखाद्याच भागावर सूज येणे अशा तक्रारी सुरू होतात.
 
पचायला जड असल्याने जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर पचनशक्ती मंदावते.वारंवार अजीर्ण-अम्लपित्तासारखे त्रास होऊ लागतात. यामुळेदेखील चेह-यावर, गालांच्या उंचवट्यांवर सूज येते. वजन जास्त असेल तर, वारंवार जखमा होत असतील तर, जखमा भरून येत नसतील तर दही वर्ज्य करावे.
 
असे गुणधर्म असले तरी दही अरूची घालवणारे आणि शक्ती वाढवणारे आहे अर्थात् पचनशक्ती उत्तम असताना खाल्ले तरच!
 
...तर दही पूर्ण वर्ज्य करू नये पण नियमित आणि भरपूर प्रमाणात खाऊ नये. अदमुरे दही खाऊ नये. दही खायचे असल्यास दिवसा खावे. दह्याबरोबर साखर, तूप, मूगाचे वरण, मध, आवळा यांपैकी एखादा पदार्थ असावा. उन्हाळ्यात, सप्टेबर- ऑक्टोबर महिन्यात दही खाऊ नये.