अभ्यंग (आयुर्वेदोक्त)

18 Feb 2022 11:58:28
आज आरोग्यरक्षणाच्या आणि एका उपायाबद्दल थोडक्यात माहिती.

Abhyang (Ayurveda)
 
सर्वांनी नियमितपणे सगळ्या अंगाला अभ्यंग करावे अर्थात तेल-मालिश करावी. जे तेल लावायचे ते किंचीत कोमट असावे. अंगावरल्या केसांच्या विरूद्ध दिशेने अभ्यंग करावे. त्यानंतर व्यायाम करून मग गरम पाण्याने आंघोळ करावी. हो.. सांगायचं राहिलंच.. अभ्यंग सकाळी करावे... सकाळी अगदीच जमत नसेल तर संध्याकाळी किंवा रात्री झोपताना करावी. अभ्यंग करताना पोट भरलेले नाही ना हे मात्र बघावे.
  
नियमित अभ्यंग करण्याने थकवा कमी होतो, गुटगुटीपणा वाढतो, शक्ती वाढते, त्वचेचा पोत सुधारतो, सुरकुत्या पडत नाहीत, त्वचा आघात सोसायला सक्षम होते. दॄष्टी सुधारते. झोप चांगली लागते. वेदना थांबतात.
 
अभ्यंग करण्यासाठी तिळाचे तेल चांगले. त्वचेवर उष्णतेने फोड उठत असतील तर मात्र खोबरेल तेल वापरावे.
 
अभ्यंग करायला केव्हा बुट्टी मारावी हेसुद्धा माहित असावे.
 
१) ताप असताना
२) कफाचे त्रास होत असताना
३) वमन-विरेचन-बस्ति हे उपक्रम झाल्यानंतर
४) अपचन झालेले असताना
  
यापैकी कोणतीही अवस्था असता अभ्यंग करू नये. अपचन, ताप बरा झाला की आणि वमन-विरेचनानंतर पुन्हा मूळ आहारापर्यंत आल्यानंतर अभ्यंग करावे.
 
आणि हो... डोक्याला, कानांना व पायांना अभ्यंग करणे विसरू नये. हे तीन सतत कार्यरत असणारे अवयव आहेत. त्यामुळे त्यांचा श्रमपरिहार..जो अभ्यंग केल्याने होतो, तो अत्यावश्यक आहे.
 
ता.क. - अभ्यंग केल्यानंतर आंघोळ झाली की बाथरूमची फरशी स्वच्छ करावी. म्हणजे त्यावरून आपला वा अन्य कुणाचा पाय घसरून अनावस्था प्रसंग ओढावत नाही. (आणि घरातली मंडळी आपल्या अभ्यंग करण्याला हरकत घेत नाहीत.)
Powered By Sangraha 9.0