व्यायाम कसा करावा?

Bhardwaj Ayurved    18-Feb-2022
Total Views |
आयुर्वेदानुसार व्यायाम कसा करावा याची माहिती घेऊयात.
 
how to exercise?
 
व्यायाम म्हणजे शरीराला कष्ट पडतील अशी शिस्तबद्ध हालचाल. यात योगाभ्यास, दंड-बैठका-जोर, gym मधील work out, धावणे, मैदानी खेळ,पोहणे या सगळ्यांचा अंतर्भाव करता येतो.
 
व्यायाम शक्यतो सकाळी करावा. सगळ्या अंगाला तेलाने मसाज करून मग व्यायाम करणे उत्तम. व्यायाम करताना पोट रिकामे असावे. “नाश्ता करून, दूध पिऊन व्यायाम” असे करू नये. आणि एक महत्वाचे व्यायामाच्या मधे-मधे पाणी न पिणे उत्तम. व्यायामादरम्यान तहान तहान होत असेल तर आपला व्यायाम शक्तीपेक्षा जास्त होतोय असे समजावे. आप-आपल्या शारिरीक क्षमतेचा अंदाज घेऊन व्यायाम करावा. म्हणजे कपाळावर, काखेत घाम आल्यावर किंवा धाप लागल्यास व्यायाम थांबवावा. नियमित व्यायाम केल्यास धाप लागण्याची व घाम येण्याची वेळ उशीरा येऊ लागते, त्यानुसार व्यायामची वेळ वाढवता येते. आणि हो...धाप लागण्याची व घाम येण्याची वेळ ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. तसेच क्षमता वाढण्यासाठीसुद्धा प्रत्येकाला वेगवेगळा कालावधी लागू शकतो. सवय नसताना प्रमाणाबाहेर व्यायाम करण्याने खूप तहान लागणे, चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे,पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणे, नाकातून रक्त येणे, शौचावाटे/ लघवीतून रक्त जाणे, खोकला, उलटी होणे, ताप येणे तसेच थकवा येणे, वजन वेगाने घटणे असे त्रास होताना दिसतात. टप्प्या-टप्प्याने व्यायाम वाढवल्यास शरीराची हानी टळते.
 
हिवाळ्यात निसर्गत:च आपली शक्ती उत्तम असते. त्यामुळे या ऋतूमध्ये थोडा अधिक व्यायामही सहन होतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात मात्र शक्ती राखूनच व्यायाम करावा. नियमित व्यायाम करणा-यांनी आहारात दूध,लोणी,तूप यांचा आवर्जून समावेश करावा.
 
वाताचा त्रास, अपचन,पित्ताचा त्रास असेल तर तब्येत ठीक होते तोवर व्यायामाला बुट्टी मारावी.
 
या नियमांच्या चौकटीत नियमित व्यायाम केल्यास पचनशक्ती सुधारणे, शरीर हलके व चपळ होणे, उत्साह वाढणे, शक्ती वाढणे, चरबी कमी होणे, शरीर सुडौल होणे हे लाभ मिळतात.